कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत.
१२वी नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की आता वाटतं की जास्त पैसे असते तरी अशी मजा नसती आली. त्यावेळी मोबाईलचे आजच्या सारखे प्रस्थ नव्हते. हल्ली तर सातवी आठवी पासून पोरं मोबाईल बाळगतात.
घरी खरी कॉलेज ची वेळ माहीत कुठे होती. सकाळी ८ ला कॉलेज भरते इतकच माहीती. त्यामुळे दिवसभर हुंदडून घरी यायला ४ वाजायचे. आल्यावर अबरचबर करून झाले कि लगेच गणिताच्या क्लासला बाजीराव रोड वर …. प्रा. मनिषा देशपांडे याच्या वर्गात. इथे परत सर्व ग्रुप शेजारी शेजारी म्हणजे धमालच. त्या प्राध्यापिका MD यावानेच ओळखल्या जातात. BCS ला गणितात जो काही पास झालो तो त्यांच्यामुळेच. परत क्लास वरून घरी येईपर्यंत जेवणाची तयारी झालेली असायची. थोडक्यात काय तर घर म्हणजे अक्षरशः लॉजिंग आणि बोर्डिंग झाले होते.
बर आता इतका मोठा ग्रुप म्हणजे छोट्या छोट्या औटींग ट्रिप्स या अनिवार्य असायच्या. त्यात पुण्याला लागुनच अनेक ठिकाणे आहेत. जसे सिंहगड, खडकवासला, पानशेत, मुळशी, भुशी. ही लिस्ट संपणार नाही. या सर्व ठिकाणांना ३ वर्षात मिळून कोटी वेळा तरी गेलो असू. सगळी ठिकाणे साधारण ५० कि.मी च्या अंतरावर असल्याने कॉलेज सुटायच्या वेळी निघून सगळे क्लास च्या आधीपर्यंत सहज घरी पोचायचे. बर इतक्या ट्रिप्स झाल्या तरी कोणाच्याच घरी माहित नाही.कुठे जायचा म्हणाला की सर्व मैत्रिणी एका पायावर तयार. आई बाबा नेहमी सांगायचे की गाडी घेवून दिली आहे ती कॉलेजला जाण्यासाठी. पोरी फिरवायला नाही. जर आम्हाला कधी समजलेना की पोरी फिरवतो आहेस तर गाडी काढून घेणार. मी पण जोरात हो म्हणायचो.
इतक्या ट्रिप्स केल्या त्यातल्या ९०% ट्रिप्सच्या वेळी माझी गाडी पंक्चर व्हायची. अगदी ठरवून माझीच बर का. दुसऱ्या कोणाचीही कधीही झाली नाही. आधी वाटायचं की माझ्या गाडीमुळे होत असेल. म्हणून चालवायला मी दुसरी गाडी घ्यायचो. तरी नियमात बदल हा नाही. मी जी गाडी चालवीन ती पंक्चर व्हायची ती व्हायचीच. पण यामुळे सगळ्या ट्रिप्स चांगल्याच लक्ष्यात राहिल्या सर्वांच्या.
एकदा नुकताच सिंहगड वारी उरकून आलो होतो. आणि शेजारच्या काकू आईला सांगत होत्या “अहो त्या जोशांचा बंड्या आहे ना तो परवा म्हणे कॉलेजच्या पोरींबरोबर खडकवासल्याला भिजायला म्हणून गेला होता. कशी काय यांच्या घराची लोकं यांना सोडतात देव जाणे.” त्या काकूंना एक मुलगी होती. भोचक भवानी होती एकदम. तिच्या कृपेने त्या कायम अपडेटेड असायच्या. मी आपलं ते ऐकून तिथून पोबारा केला. म्हणालो जपून राहिलेला बरे.
सही…पण ती शेजारची मुलगी, तिला कसं कळायचं?? ती पण असायची कां? तिलाच गृप मधे ओढुन घ्यायचं… झालं.
महेंद्रजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
त्या मुलीला बिल्डींग मधल्या इतर मित्र मैत्रिणींकडून समजायचं. ती मुलगी म्हणजे मी बरी आणि माझा अभ्यास बरा अशी होती, पण एकदाच्या बाता तिकडे करण्यात एक्सपर्ट होती म्हणूनच कोणाच्या ग्रुप मध्ये नव्हती.