समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे येणारा पचाक पचाक आवाज येत असला तर??
भुर्रूक पचाक पचाक.. ऐकून अंगावर शिसारी आली. म्हणालो नक्की कोणीतरी देसी असणारे. कारण अमेरिकेत हे असलं वर्तन आपण एखाद्या देसीकडूनच अपेक्षित करतो.
उठून उभा राहिलो आणि बघितल तर काय? समोर साक्षात १ देसी संगणाकाकडे बघत तल्लीन होऊन चमचा त्या कपातल्या कॉफीत गरागरा फिरवत होता. नाव गाव समजल्यावर कळले कि तो १ NRI मराठी तमिळ आहे. म्हणाला कालच रुजू झालोय. काल तू सुट्टीवर होतास म्हणून भेट नाही झाली आपली.म्हणाला मी मद्रासी आहे पण जन्मापासून मुंबईकर असल्यामुळे तमिळ कमी आणि मराठी जास्ती येतं मला. मी बरं म्हणालो. मग त्यांनी कोणत्या प्रोजेक्ट साठी आलाय वगैरे सांगितलं.
त्या दिवशी त्याने जेवणाचा डबा आणला नव्हता म्हणून मी वाचलो नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने चळचळत्या लसून फोडणीच्या वासाचे, तर्रीवाले डबे उघडायला सुरवात केली. त्याचं खाऊन झाल्यावर १ तासभर आसमंतात तो वास दरवळत असायचा. मग मी एकदा त्याच्या बॉसला माझ्या क्युबिकल मध्ये कामानिमित्त बोलावले होते. तो आल्या आल्या म्हणाला वास कसला येतोय? मी पलीकडून असं बोट दाखवले. म्हणून त्याने डोकावून पहिले तर त्याला तिथे विश्वरूप दर्शन झाले. माझं न बोलताच काम झाले. मग यथावकाश त्याने त्याला सांगितले आणि ते वासू डबे बंद झाले.
तरीपण भुर्रूक पचाक पचाक चालूच होते. असाच एकदा तो तल्लीन होऊन कडडम कडडम करत असताना मी म्हणालो चमचा पण विरघळेल रे!! हळू ढवळ जरा. मग जरा आवाज कमी झाला.
मी विचार केला कि हा माणूस गेली ४ वर्ष अमेरिकेत असाच वागत आलाय कि काय? अवघड आहे याचे. घरी तू कसा पण का वाग ना. कोण काय म्हणणारे तुला.
मी असे म्हणत नाही कि मी एटिकेट्स चे पुस्तक कोळून प्यायलोय वगैरे पण कमीत कमी बघावे आपण कुठे आहोत, आजूबाजूचे लोक कसे वागत आहेत आणि आपण कसे वागतोय, आपण इथे काय करतोय?
अमेरिकेसाठी निघताना पुण्यात HR नी एक एटिकेट्सचा कोर्स करायला लावला होता. त्यात सगळं शिकवल होतं चारचौघात कसे खायचे, काटा चमच्यानी कसं खायचं, आवाज न करता कसं खायचं ई ई.
मला वाटतंय कि एकतर याने तो कोर्स नक्की बंक केला असणार किंवा त्या शिकवणाऱ्या मास्तरला तरी सगळं विसरायला भाग पाडलं असणार.
असे बरेच लोकं आहेत. अमेरिकेतलीच गोष्ट आहे. आम्ही एकदा भारतीय हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. बरोबर अमेरिकन पण होते. तिथे काही तेलगु लोकं पण आलेले आणि आपण कुठे आहोत हे विसरून सवयीप्रमाणे हातानेच रस्सम् भात ओरपत होते. आपल्याला च इतकी किळस वाटते तर बाकीच्यांना जेवताना असे दृश्य पहाणे किती घाण वाटत असेल. ह्या असल्या लोकांमुळे सगळे भारतीय बदनाम होतात.
या लोकांन्ना असल्या गोष्टींची आजिबात फिकीर नसते. ते जाम आडमुठे लोक असतात असा माझा अनुभव आहे.
‘सुर्र के पियो’ ही त्या चहाची जाहिरातिचा परिणाम असावा कदाचित हा…
सिद्धार्थ,त्यांच ते भात ओरपतानाच भयंकर दृश्य पाहिलंय मी….
त्याने मग ती जाहिरात फारच मनावर घेतलेली दिसत आहे. आणि पातळ भात ओरपतानाच्या दृश्याबद्दल न बोललेच बरं. खरच नाही बघवत.