Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑक्टोबर, 2009


घरापासून दूर दिवाळी साजरी करायची कल्पनाच किती असह्य आहे.घरापासून दूर म्हणजे अगदी एकवेळ आपण भारतात जरी कुठेही असलो तरी दिवाळीची थोडी का होईना मजा आपण लुटू शकतो. कारण थोड्या फार फरकाने सगळीकडे दिवाळी ही साजरी होते. चालीरीतींचा आणि खादाडीचाच काय फरक असेल तो. आपले किती तरी आप्तस्वकीय आपल्यापासून, भारतापासून दूर राहतात ते कशी बरे करत असतील दिवाळी साजरी?
माणसाने कामानिमित्त अगदी चंद्रावर राहावे पण दिवाळीसाठी त्यानी आपल्या घरीच यावे. अशी माझी मनस्तिथी झाली आहे.

दिवाळीसाठी वातावरण निर्मिती:
दिवाळीसाठी वातावरण निर्मिती चालू करण्यात खालील गोष्टींचा समावेश असतो.

  • पिठाच्या गिरण्या चकलीच्या भाजणीच्या, ह. डाळीच्या डब्यांनी गच्च भरून जायला सुरवात होते
  • रस्त्यातून जाताना चकलीच्या खमंग वासाची झुळूक येते
  • बिल्डींग मधून कुठून तरी बेसनाच्या लाडूचा वास हजेरी लावून जातो
  • चकली / शेवेचा सोऱ्या / यंत्र शेअरिंग बेसिस वर फिरू लागते
  • रस्त्यात, दुकानात रंगीबिरंगी आकाशकंदील दिसू लागतात
  • दैनिक सकाळ मध्ये मधूनच फोटो येतो की लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीची लगबग / लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलून गेला वगैरे. या सुमारास चितळे बंधू ग्राहकांसाठी सज्ज अशी पण बातमी एकदा वाचली आहे.

दिवाळी म्हणजे थोडक्यात ती संपताक्षणी परत कधी येणार अशी वाट बघत बसतो तो सण. नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात आले रे आले की पहिल्यांदा काय पाहायचे तर दिवाळी कधी आहे, किती दिवस आहे. ज्या वर्षी अगदी ५ दिवस दिवाळी असेल त्या वर्षी अगदी भारी वाटत की यंदा खूप दिवस अनुभवायला मिळणार दिवाळी. पण एक आहे की दिवाळीचा शेवटच्या दिवसाची संध्याकाळ कधी येउच नये अशी असते. त्या संध्याकाळी फराळाचे रिकामे डबे, संपलेले / फुसके म्हणून उरलेले फटाके, खिडकीतून काढून ठेवलेला आकाशकंदील, शाळा / कॉलेज / ऑफिस चालू व्हायची तारीख असं सगळं नको नको ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागते आणि उद्या पासून तेच रहाट गाडगे पुन्हा चालू अशी भावना मनात येते.

लहानपणची दिवाळी
लहान असताना सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर अगदी टाकणे टाकल्या सारखा लिहिला जायचा. कधी एकदा परीक्षा संपते आणि ती दिवाळीची सुट्टी लागते असं झालेलं असायचं. दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा. लवंगीची माळ सुटी करून वाजवायची. नरकचतुर्दशीला सकाळी पहिला फटका कोण लावतो त्याची स्पर्धा लावायची आणि अजून कित्ती तरी गोष्टी…

दिवाळी म्हणजे कल्ला करायचा. नवे कपडे घ्यायचे , किल्ला करायचा. या किल्ला प्रकारामुळे लहान मुलांच्या क्रीएटीव्हीटीला चालना मिळते. ऑफिशियली चिखलात खेळायला मिळतं ती गोष्ट वेगळी. किल्ला करून झाला की त्यावर अळीव पेरायचे. मग ते उगवले की सगळी चित्र मांडायची. गुहेत वाघ, विहिरीपाशी पाणी भरणारी बाई, मावळे, भाजीवाल्या बायका आणि अति महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराज स्थानापन्न करायचे. एका दिवाळीत तर मी त्या वाघाच्या गुहेत चक्क १ डायनोसोर पहिला होता.

आज त्या सगळ्या साजऱ्या केलेल्या दिवाळ्या डोळ्या समोर येत आहेत. आणि आज असे भारतापासून इतक्या दूर अमेरिकेतल्या एका खेड्यात जिथे मोजून ४ भारतीय टाळकी आहेत अशा वातावरणात दिवाळी सेलीब्रेशन म्हणजे नर्व्हस ब्रेकडाऊन व्हायची वेळ आली होती. पण जशी दिवाळी जाईल असे वाटत होते तशी ती बिलकुल गेली नाही. एक नातेवाईक जवळच राहतात त्यांच्या कडे दिवाळी साठी गेलो होतो. म्हणून दिवाळीची मजा लुटता तरी आली आणि बिन दिवाळीचा जो काही बोजा मनावर होता तो पूर्णपणे निघून गेला.
इतकी वर्षे पुण्यात असताना बरेच भाऊ, मित्र वगैरे असेच शिक्षणासाठी घरापासून दूर गेले होते. तेव्हा वाटायचे की ते लोक त्यांच्या मित्रांसोबत एकत्र जमून वगैरे साजरी करत असतील दिवाळी. त्यामुळे ते लोक दिवाळीला काय करत असतील असा साधा विचार सुध्धा कधी मनात आला नव्हता. आज मला कळले की त्यांनी दिवाळी कशी साजरी केली असेल. कळली म्हणजे कोणाची पाहून कळली नसती स्वतःला अनुभवायला मिळाली म्हणून जाणीव तरी झाली. अन्यथा असे पण काही असते असं कधी कळलेच नसते.
असो जे काही होतं ते चांगल्या साठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. पुढच्या वर्षी ही कसर भरून काढीन.

दीपावलीच्या आणि नूतन सवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

Read Full Post »