Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2010


भेळेच्या धंद्याला तसं म्हणालं तर मरण नाहीच. मंदी असो वा नसो, सिझन कोणताही असो, भेळ हि खावी लागतेच. म्हणजे कोणी खाण्याशिवाय राहूच शकत नाही. एक जमाना असा होता मी आणि मित्र न चुकता सलग २ ते ३ वर्ष रोज भेळ खायचो. अगदी रोज, न चुकता, तरी कंटाळा वगैरे कधीच नाही आला. आणि आता अमेरिकेत आल्यापासून अगदी तरसतोय भेळेसाठी. इतक्या ठिकाणी भेळ खाल्ली तरी गणेश भेळेसारखी सारखी भेळ कधीच आणि कुठेही खाल्ली नाही. बेंगळूरूला असताना भेळ खायची हुक्की आली म्हणून एका ठिकाणी भेळेची ओर्डर दिली आणि मला प्लेट मध्ये जे काही मिळाले त्याला मी काही केल्या भेळ म्हणायला तयार नव्हतो. त्या प्लेट मध्ये असा त्रिकोणी रचलेला भेळेवजा चुरमुर्यांचा लगदा होता. अगदी गचगचीत ओली भेळ. त्याला न चव ना ढव. मी म्हणालो भेळ दिली आहे का कालवलेला दक्षिणात्य भात? तो कानडी मित्र मिटक्या मारत खात होता. मी त्याला म्हणालो एकदा पुण्या मुंबईची भेळ काय असते खाऊन बघ. परत कधीही मी तिथे असे पर्यंत भेळेच्या वाटेला गेलो नाही. भेळेशिवाय अगदी उपासमार चालू होती.

आता पुण्यात भेळ खायची तर कुठे? जसं मिठाई साठी चितळे बंधू तसं भेळेसाठी गणेश भेळेशिवाय दुसरं दुकान / गाडी असूच शकत नाही. त्यांची पहिली गाडी लागायची ती कर्वे रोड वर आत्ताचे Mac’D आहे ना त्या लेन च्या जवळ. मग तिथून ती गाडी कर्नाटक हायस्कूल च्या समोर प्राची / अतिथी हॉटेल पाशी असायची. नंतर त्यांनी भरतकुंज सोसायटी मध्ये १ दुकान थाटले आणि आता या  गणेश भेळेच्या पण पुण्याच्या उपनागत अनेक ब्रान्चेस आहेत.  याशिवाय अजूनही काही प्रसिद्ध भेळवाले आहेत. जसे कॅनॉल वरची भेळ (SNDT कॉलेजच्या कॅनॉल वरून लॉ कॉलेज रस्ता क्रॉस करून तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला हे भेळ मिळते ), पुष्करिणी भेळ (बहुतेक अप्पा बळवंत चौकाच्या जवळ एक शूज चे दुकान आहे त्याच्या जवळ मिळते. दुकानं अवघे काही तासांकरिता उघडते), नवरंग भेळ (फडतरे चौकात शर्मिली दुकानाला लागुनच आहे हे दुकान). कर्वेनगरला ताथवडे उद्यानाजवळ एक भेळेचे दुकान आहे. अगदी गणेश भेळेच्या तोडीची भेळ मिळते इथे. त्याचा नाव विसरलो मी. बहुतेक विशाल भेळ असावे…. याशिवायही भेळेचे चोचले पुरविण्यासाठी सर्व बाग / उद्यानांबाहेर अनेक भेळ वाले आहेत, ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

आता भेळ खायला गेल्यावर नुसताच खेळ खाऊन घरी असं सहसा होत नाही. मग आलोच आहे तर पाणी पुरी , SPDP, रगडा पुरी पण होऊन जाऊदे असं होते. घरी कितीही म्हणालं की भेळ करू तरी त्या घराच्या भेळेला “त्या” भेळेची सर कधीच येत नाही.

भेळ खाताना जीभ झोंबून डोळ्यातून पाणी आलं की जे वाटतं ना की हाह आता बरे वाटले त्याला म्हणतात चटपटीत खाल्ल्याचे समाधान. आत्मा तृप्त होणे, ब्रह्मानंदी टाळी वाजते म्हणजे काय ते हेच असावे.

Read Full Post »


आज जिम मध्ये स्टीम बाथ घ्यायला बसलो होतो. शेजारी एक अमेरिकन आर्मी मधला सांड जवान येवून बसला. एकमेकांना हाय हेलो केल्यावर दुसरं वाक्य म्हणाला की तू कोणत्या चर्च मध्ये जातोस? त्याने सांगितला की तो कुठे जातो, आठवड्यातून कितीवेळा ई. मी असं ऐकून आहे की या चर्चचे बरेच प्रकार असतात. मी त्याला म्हणलो की मी चर्च मध्ये नाही जात. मी देवळामध्ये जातो. तो म्हणाला म्हणजे काय? मी म्हणालो की मी हिंदू आहे म्हणून प्रार्थनेसाठी देवळात जातो. हे ऐकून त्याला काय झाला काय माहीत, तो जो सुटला ना….

मला ख्रिश्चन धर्माची महती सांगू लागला. झिझसचे असं आहे तसं आहे. चर्च मध्ये असं असतं याव आणि त्याव. मग म्हणालो याच्या आयला..मी पण चालू झालो.

त्याला हिंदू धर्माची महती सांगू लागलो. जवळ अर्धा तास ही विचारांची तीव्र देवाण घेवाण चालली होती. मला म्हणे आमचा धर्म सांगतो की प्राण्यांना मारा आणि आपली भूक भागवा. मी म्हाणालो आमचा धर्म अहिंसेवर विश्वास ठेवतो. त्याला म्हणालो आम्ही प्रत्येक प्राण्यात देव आहे असं समजून वागतो. म्हणालो मी आजतागायत मास भक्षण केले नाहीये. गाय ही आम्हाला देवासारखी असते. आम्ही तिला खात नाही. त्याचा सांगण्याचा पवित्रा असा होता की त्याचा धर्म लयी भारी आणि आम्ही कोण कुठले.  त्याला अगणिक ठिकाणी मी क्रॉस केल्या वर बराच नरमला होता. एकतर त्या स्टीमबाथ रूम मध्ये इतका वेळ बसून माझा उकडलेला बटाटा होण्याची वेळ आली होती. पण म्हणालो ही संधी दवडता कामा नये. त्याला म्हणणार होतो की तू भारी असशील, तुझा धर्म तुझ्या साठी भारी असेल पण त्यामुळे माझा धर्म कमी प्रतीचा होत नाही. ऐवजी मी म्हणालो की माझा धर्म मला समानतेची शिकवणूक देतो. दुसर्या धर्माचा असला तरी तो आमच्या साठी हीन दर्जाचा होत नाही.

आपलं श्रेष्ठत्व २ प्रकारे सिद्ध करता येतं. एक तर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणे किव्वा दुसऱ्याला आपल्या पेक्षा कमी दर्जाचा सिद्ध करणे. या मुर्खासाठी दुसरा उपाय निवडला. त्याला मी शेवटच्या बॉल वर six मारून गार केले. त्याला म्हणालो आम्ही हिंदू धर्मात बळजबरीची  धर्मांतरं  करत नाही. हिंदुत्व ही जगण्याची एक पद्धत आहे. तुम नाही समझोगे….. तो गप्पच बसला.मग त्याला म्हणालो तुझे व्यूज ऐकून बरं वाटला. परत भेटलास तर उलटी मारीन.

Read Full Post »


कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत.

१२वी  नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की आता वाटतं की जास्त पैसे असते तरी अशी मजा नसती आली. त्यावेळी मोबाईलचे आजच्या सारखे प्रस्थ नव्हते. हल्ली तर सातवी आठवी पासून पोरं मोबाईल बाळगतात.

घरी खरी कॉलेज ची वेळ माहीत कुठे होती. सकाळी ८ ला कॉलेज भरते  इतकच माहीती. त्यामुळे दिवसभर हुंदडून घरी यायला ४ वाजायचे. आल्यावर अबरचबर करून झाले कि लगेच गणिताच्या क्लासला बाजीराव रोड वर …. प्रा. मनिषा देशपांडे याच्या वर्गात. इथे परत सर्व ग्रुप शेजारी शेजारी म्हणजे धमालच. त्या प्राध्यापिका MD यावानेच ओळखल्या जातात. BCS ला गणितात जो काही पास झालो तो त्यांच्यामुळेच. परत क्लास वरून घरी येईपर्यंत जेवणाची तयारी झालेली असायची. थोडक्यात काय तर घर म्हणजे अक्षरशः लॉजिंग आणि बोर्डिंग झाले होते.

बर आता इतका मोठा ग्रुप म्हणजे छोट्या छोट्या औटींग ट्रिप्स या अनिवार्य असायच्या. त्यात पुण्याला लागुनच अनेक ठिकाणे आहेत. जसे सिंहगड, खडकवासला, पानशेत, मुळशी, भुशी. ही लिस्ट संपणार नाही. या सर्व ठिकाणांना ३ वर्षात मिळून कोटी वेळा तरी गेलो असू. सगळी ठिकाणे साधारण ५० कि.मी च्या अंतरावर असल्याने कॉलेज सुटायच्या वेळी निघून सगळे क्लास च्या आधीपर्यंत सहज घरी पोचायचे. बर इतक्या ट्रिप्स झाल्या तरी कोणाच्याच घरी माहित नाही.कुठे जायचा म्हणाला की सर्व मैत्रिणी एका पायावर तयार. आई बाबा नेहमी सांगायचे की गाडी घेवून दिली आहे ती कॉलेजला जाण्यासाठी. पोरी फिरवायला नाही. जर आम्हाला कधी समजलेना की  पोरी फिरवतो आहेस तर गाडी काढून घेणार. मी पण जोरात हो म्हणायचो.

इतक्या ट्रिप्स केल्या त्यातल्या ९०% ट्रिप्सच्या वेळी माझी गाडी पंक्चर व्हायची. अगदी ठरवून माझीच बर का. दुसऱ्या कोणाचीही कधीही झाली नाही. आधी वाटायचं की माझ्या गाडीमुळे होत असेल. म्हणून चालवायला मी दुसरी गाडी घ्यायचो. तरी नियमात बदल हा नाही. मी जी गाडी चालवीन ती पंक्चर व्हायची ती व्हायचीच. पण यामुळे सगळ्या ट्रिप्स चांगल्याच लक्ष्यात राहिल्या सर्वांच्या.

एकदा नुकताच सिंहगड वारी उरकून आलो होतो. आणि शेजारच्या काकू आईला सांगत होत्या “अहो त्या जोशांचा बंड्या आहे ना तो परवा म्हणे कॉलेजच्या पोरींबरोबर खडकवासल्याला भिजायला म्हणून गेला होता. कशी काय यांच्या घराची लोकं यांना सोडतात देव जाणे.” त्या काकूंना एक मुलगी होती. भोचक भवानी होती एकदम. तिच्या कृपेने त्या कायम अपडेटेड असायच्या.  मी आपलं ते ऐकून तिथून पोबारा केला. म्हणालो जपून राहिलेला बरे.

Read Full Post »


पूर्वी अमेरिकेतले मित्र किंवा clients म्हणायचे कि आज काय मस्त ब्राइट सनी डे आहे. मस्त सूर्य प्रकाश पडला आहे. हे ऐकून वाटायचा काय वेडे आहेत कि काय? या तळतळात करणाऱ्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाला चांगला म्हणत आहेत. पण आत्ता अमेरिकेत आल्यावर समजले ते असा का म्हणायचे.

परवा अशाच एका मस्त दिवशी नकळतपणे मीच म्हणून गेलो कि आज किती मस्त ब्राइट सनी डे आहे. तेव्हा माझी ट्यूब पेटली. त्याचा होतं असं कि अमेरिकेतले हवामान इतका बेक्कार आहे ना कि काही करायची सोय नसते. हिवाळ्यात एकतर कडाक्याची थंडी असते आणि सगळीकडे बर्फ असते. म्हणून कुठेही असं फिरायला गेला आहात असं होत नाही. थंडीमुळे सर्व झाडांची पानगळ झालेली असते. झाडे सुद्धा भकास दिसतात. त्यात सोने पे सुहागा म्हणजे हवा ढगाळ असते. कि सगळंच संपलं. पाउस सुद्धा अधून मधून म्हणजे सारखीच हजेरी लावत असतो. त्यामुळे ढगाळ हवा ही ओघानी आलीच. मग असा मस्त ब्राइट सनी डे असला कि सगळे लोक बाहेर पडतात. हॉटेल मध्ये गर्दी होते, शॉपिंग मॉल गर्दीने फुलून जातात. छान छान मुली सुंदर सुंदर कपडे घालून बाहेर पडतात. कि मन कसे प्रसन्न होऊन जाते. मन ताजेतवाने करण्यासाठी अमेरिकन सरकार अधून मधून अशा मस्त दिवसासाठी निसर्गातसुद्धा हस्तक्षेप करत असले पाहिजेत.

Read Full Post »