Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2015


मालती: काय हो कुठपर्यंत पोचले असतील?

मी: अगं आत्ता तर निघाली सगळी १ तासापूर्वी अजून लोणावळ्यापर्यंत पण नसतील पोचले.

मालती:  मी फोन करून बघू का एकदा?

मी: अगं असं वेड्या सारखी काय करतेस? राम म्हणाला ना कि आम्ही विमानतळावर पोहोचून बग्स दिल्या की खुशालीचा फोन करतो म्हणून?

मालती: अहो माहिती आहे मला. तुम्ही जरा गप्पं बसा बघू.

मी: मला माहित्ये की तु फोन केल्याशिवाय शांत बसणार नाहीस. तर कर मग फोन एकदाचा.

५ मिनिटांनी …

मालती: अहो अजून लोणावळ्याला पण नाही पोचले ते.

मी तिचं बोलणं मान आडवी हलवत ऐकत होतो. मी फक्त हो का एव्हढच बोललो.

मालती: होय हो माहिती आहे सांगत होतात. सर्वज्ञानी आहात तुम्ही माहित्ये?

मी: बर ठीके, चहा करतेस का?

मालती: अहो आत्ता तर सगळे जायच्या आधी झाला चहा तुमचा.

मी: तू करणार आहेस कि मी करू?

मालती: नको, करते मी. नंतर आवराआवरी मलाच करावी लागते.

मालती पदर खोचून आत जाते आणि माझीही नजर खिडकीत दूर क्षितिजावर स्थिरावते. आभाळ एकदम भरून आलं होते. जणू काही त्याला पण समाजत होत की राम पुण्यातली सुट्टी संपवून परिवारासह अमेरिकेला परत चाललाय. सर कधी पण बरसू शकते. मी जास्तीतजास्त मन घट्ट करून वावरत होतो.

मी विचार करू लागलो कि ही शांत झालेली लगबग, चालू झाली ती सहा महिन्यान पूर्वी, डिसेंबर मध्ये.

मी असा एकदम सर्रकन भूतकाळात गेलो.

रामशी स्काईप वर बोलताना तो म्हणाला की आई आणि बाबा ऐका आम्ही सगळे मे महिन्यात सुट्टीसाठी भारतभेटीवर येण्याचा प्लान करतोय. तो म्हणाला की त्याला ३ आठवड्यांची सुट्टी मिळणारे म्हणून खास आंब्यांच्या सिझन मध्ये सुट्टी  प्लान करतोय. तो म्हणाला की मुलांच्या शाळांना सुट्टी लागली रे लागली आम्ही निघणार.

हे ऐकल्यापासून आमच्या दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. राम तब्बल ३ वर्षांनी घरी येणार या कल्पनेनीच आम्हाला भरून आले.

त्यापुढच्याच आठवड्यात त्यांनी तिकीट काढली असं सांगितले आणि आम्ही दोघे हातातली सर्व कामे सोडून नवीन वर्षाचे कॅलेंडर घेवून त्याची पाने पटापटा उलटू लगलो. कधी एकदा मे महिन्याचे पान समोर येतंय असं झालं होत  आम्हाला. एकदाचा मे महिना दिसला आणि आम्ही ते ३ आठवडे पाहू लागलो. मालती त्या मे महिन्याच्या कॅलेंडरच्या पानावरून असा हळुवार हात फिरवू लागली.

मग काय मालती वही पेन घेवून त्यांच्या सुट्टीचा प्लानच करू लागली. कि ३ दिवस तर कुलदेवाला जाऊन येण्यात जातील. मग मी सर्वांना बोलावून एक छानसं गेट टु गेदर करणारे, आणि मग ….

मी तिला न राहवून म्हणालो अगं तू त्यांच्या सुट्टीचा प्लान करत्येस खरी पण त्यांनी त्यांचा प्लान तिकिटे काढायच्या आधीच निश्चित केला असणार. ३ वर्षांनी येणारेत ते.

मालती: तुम्ही न माझ्या सगळ्या कामांनाच खोडा घालता नेहमी.

मी: अगं असं काय करतेस? रामचं केवढ मोठ मित्र मंडळ आहे, पूर्वाच्या बहिणीच लग्न आहे  म्हणून पूर्वाला सुद्धा तिच्या माहेरी राहायचे असणारे आणि हे तुझे प्लान्स?

मालती: बर पण कुलादेवीला जायच्या बाबतीत मी कोणाचेच ऐकणार नाहिये. तुम्ही कोणी आला नाहीत तर मी एकटी जायला कमी करणार नाही. आणि हो गेट टु गेदर सुद्धा करणारे.

मी: बर ठीक आहे पण त्यांना अजून या बद्दल काही बोलू नकोस. आधी त्यांचे प्लान्स ऐकून घेवू आणि मग त्यामध्ये हे तुझे प्लान्स आपण बसवु. कसे?

अजून जानेवारी उजाडला नाहीये आणि मालती म्हणजे कंबर कसून कामाला लागली आहे. तिनी मोलकरणीला सुद्धा आगावू सूचना देवून ठेवली आहे कि मुलगा, सून आणि नातवंड आल्यावर एकपण दिवस खाडा मारायचा नाहीये. अगदी रोज सांगत्ये तिला. या बाईनी कंटाळून तोवर काम सोडलं नाही म्हणजे मिळवलं .

एव्हाना आमच्या सर्व नातलगांना, आप्तेष्टांना, बिल्डींग मध्ये राम येण्याची बातमी पसरली होती. कोणी म्हणून सांगायचे राहिले नव्हते.

यंदा आमची दिवाळी मे महिन्यात येणार होती. राम अमेरिकेला गेल्यापासून दिवाळी काय असून नसून सारखीच असल्या सारखी झाली होती. आपली सर्वजण  साजरी करतात म्हणून त्यात आम्ही पण . आम्ही म्हणजे रामच्या येण्याच्या वाटेवर चातकासारखी वाट पहात  बसलेलो असतो.

बघता बघता मार्च येवून ठेपला आणि मालातीची कुरडया, पापड, बटाट्याचा कीस करायची तयारी चालू झाली. म्हणे अगदी वर्षभर पुरतील इतके जिन्नस बरोबर पाठवणारे. करुदे काय करायचे ते. तेवढाच तिचा वेळ जातोय तर जाउदे. राम आणि पूर्वा ठरवतील काय आणि किती घेवून जायचं.

तशी माझी पण काही कमी तयारी चालू नव्हती. नातवंडांसाठी बॅंकेत ठेवलेल्या ठेवी मोडून त्यांच्यासाठी आयुर्विम्याच्या पॉलीसी घ्यायच्यात, आमच्या राहत्या घरात रामला नॉमिनी म्हणून टाकायचय आणि महत्वाचं  म्हणजे राम, पुर्वा आणि दोन्ही नातवंडांचं  आधारकार्ड काढायचय, नातवंडांची नावे रेशन कार्ड वर टाकायची आहेत.

बघता बघता एप्रिल संपून मे महिना उजाडला. आम्हाला आत्तापर्यंत मे महिना इतका सुखद, शीतल कधीच वाटला नव्ह्ता. राम यायच्या वेळी पिकतील अशा आंब्याच्या पेट्या घरी दाखल झाल्या होत्या. त्या २ / ३ दिवसांनी उघडून आंबे वर खाली करून बघण्याचे काम माझ्याकडे आले होते.

सोनियाचा दिनू येवून पोचला होता. राम घरी यायला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला होता. मालतीने राम पूर्वाच्या आवडीचा खास मेनू केला होता.

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

मी: हा कोण बोलताय? राम का? हां बोल. कुठे आहेस? हां ओके हां हां. ठीके या मग.

मालती: अहो फोन ठेवलात पण? मला बोलायचं होता ना!! आणि नुसते हां ओके ओके काय करताय? आत्ता कुठे होता तो? प्रवास कसा झाला? कधी पर्यंत घरी पोचतोय? एकही प्रश्न विचारला नाहीत. लावा परत त्याला फ़ोन. पहिला लावा आणि मलाच द्या बोलयला.

मी: अगं मला बोलून देशील की नाही? जरा दम धर. राम १ तासात घरी पोचत आहे. त्याचा प्रवास वेळेत झाला. आणि बाकीचे प्रश्न तो आल्यावर तूच समक्ष विचार. पण हो त्याला येवून जर बसुदे मग विचार सगळ.

टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग टिंग ताँग

आला राम आला. इतका मोठा झाला तरी अजून बेल तश्शीच वाजवतो.

दुसऱ्या दिवशी पूर्वानीच कुलदेवीच्या दर्शनाला जायचा विषय काढला आणि मालती म्हणे हो न जाऊन येवू आपण. अगदी कस मनासारखा होत होत.

दिवस असे गोजिरवाणे पण भूर्रकन  जात होते.

बघता बघता आधारकार्ड निघाले, रेशनकार्ड वर नातू  एड झाले, तशी रामची परत जायची तारीख पण अशी समोर दिसू लागली. मला पण २ महिने खंड पडलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा दिसू लागला.

आणि राम जायची वेळ येवून ठेपली. त्याच्या जाण्याची सगळी तयारी झाली होती. आमच्याच मनाची होत नव्हती.  रामचे फोन चालू होते. त्याच्या मित्राची गाडी या सर्वांना पुण्याहून मुंबईला विमानतळावर सोडणार होती. गाडी दाराशी आल्याचा एकच ओरडा झाला. मालातीनी सर्वांना ओवाळले आणि प्रत्येकाच्या हातावर दहीपोह्याचा गोळा ठेवला. सर्वांचे नमस्कार करून झाले तसा मालातीचा हात तिचा पदर शोधू लागला. हृदयांमध्ये कालावाकालव चालू झाली होती.

मालातीचा बांध फुटला आणि ती रामला विचारू लागली परत कधी येणारेस? आता परत येशील तो कायमचाच की  परत सुट्टीवर?

मी मालतीला जवळ घेवून रामला म्हणालो तुम्ही निघा, मुंबईला वेळेत पोचलं पहिजे. सर्व सामान गाडीत ठेवून जड अंत:करणाने सर्वांना निरोप दिला.

ते गेले तरी त्या वाटेकडे बघत आम्ही दोघे फाटकापाशी तसेच उभे होतो, कितीतरी वेळ …  असं वाटू लागलं याच गेल्या ३ आठवड्यांसाठी आम्ही गेले ६ महिने हवेत जगत होतो ते आता सरलेत. परत उद्या सकाळ पासून आम्ही दोघे, दुपारी पण आम्ही दोघे आणि रात्री पण.

तोच मागून मालातीचा आवाज आला अहो चहा घ्या. मी एकदम भानावर आलो. चहाचा एक घोट घेवून रामच्या खोलीत गेलो तर असं वाटू लागले आत्ता ही लोकं काही वेळापूर्वी इथे होती आणि आता नाहीत? समोर असे नातू बसलेले दिसत होते.  पटकन डोळे पुसले आणि मालातीबरोबर चहा पिण्यात रुजू झालो.

Read Full Post »