Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2016

ती ची कहाणी – भाग- १


आपल्याला दमलेल्या बाबाची कहाणी नेहमी ऐकू येते पण कधीच दमलेल्या ति ची कहाणी ऐकू येत नाही. तीची खरं तर खूप रूपं आहेत. ती लहान असताना बाबाच्या गळ्यातला ताईत असते, मोठी झाल्यावर कोणाची प्रेयसी होते, मग त्याची बायको होते, मग ती कोणाची तरी आई होते. मुलं थोडी मोठी होत आहेत तोवर थकलेल्या बाबाची ती परत आई बनते आणि आजी तर ती झालेली असतेच. ती कधी थकतच नाही. म्हणूनच थकलेल्या तिची कहाणी कधी आलीच नसावी.

लग्नाआधीची ती एकदा दमते तेव्हा….. म्हणजे दमल्ये असं वाटत तेव्हा…

दुपारी बरोबर ४ ला तिचा मेसेज आला.

“५.३० ला टपरी पाशी भेटू. बाय.”

नेमका मी होतो मीटिंग मध्ये म्हणून तिला मेसेज करता येईना. ४.१० ला परत दुसरा मेसेज.

“काय रे येतोयस ना?”

मीटिंग मध्ये मी नेमका मेनेजरच्या शेजारी बसलो होतो म्हणून मला मेसेज पण करता येईना. पण हळूच तिला येतोय असा मेसेज टाकला. नंतर मीटिंग संपेपर्यंत तिचे २ मेसेज आले हार्ट आणि लव यु लव यु लिहून पाठवलेले. मी म्हणालो बाईसाहेब आज एकदम खुशीत दिसतायत.

टपरीवर पोचतो ना पोचतो तोच ती धापा टाकत आली. आणि म्हणाली “कश्शी बश्शी घुसले त्या बसमध्ये. असली गर्दी होती म्हणून सांगते आज .”
आमच्या टपरीची जागा म्हणजे अशी एकदम दिलखेच होती. गावातल्या तळ्याच्या कठड्यावर आम्ही पाय सोडून असे संध्याकाळी गुचू गुचू करायला भेटतो.आणि ते टपरीवाले मानेकाका आम्हाला आता चांगलेच ओळखतात म्हणून आम्ही आलो की आमचा स्पेशल चहा आमच्या समोर असतो.

आज आम्ही कट्ट्यावर बसलो आणि ती एकदम मला बिलगून बसली. माझा उजवा हात घट्ट धरून खांद्यावर डोकं ठेवून स्थिरावली. आणि म्हणाली जरा वेळ काहीही बोलू नकोस अगदी हु की चू पण करू नकोस. आज मी जाम वैतागले आहे आणि दमल्ये पण. मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणालो की ओके. तिनी माझा हात हातात धरला होता. मी माझ्या करंगळीनी तिच्या हाताच्या तळव्यावर असं वर खाली केला. तशी ती एकदम ओरडली. शांत बस म्हणून बोल्ल्ये ना एकदा. सगळीकडे एकदम अशी निरव शांतता पसरली. आम्ही दोघे एका ट्रान्स मोड मध्ये गेलो होतो. आत्ता आमची अशी स्तिथी होती ज्याला आम्ही “काही नको अवस्था” म्हणतो. “काही नको अवस्था” म्हणजे अशी स्तिथी की ज्यात आम्हाला हा काळ संपेपर्यंत बसून रहावसं वाटतं. अगदी खायला नको की प्यायला नको. दो दिल एक जान सारखा एकमेकांचा सहवास हवा असतो. सुख म्हणजे नक्की असच असावं असं आम्हाला वाटतं.

असो जरा विषयांतर झालं खरं. मग आम्ही १ तासभर तसे बसून होतो.
सध्या तिच्या ऑफिसमध्ये एका डेडलाईन साठी कामाचे खूप प्रेशर आहे. त्यामुळे दर दोन दिवसातून एकदातरी ती त्या मेनेजर वर भडकलेली असते.
नंतर तिच्या आईचा मेसेज आला घरी कधी येत्येस म्हणून आणि आमची समाधी भंग पावली. मला म्हणते आई शप्पथ काय बरं वाटलंय म्हणून सांगते तुझ्या जवळ बसून. माझा थकवा, शीण कुठल्या कुठे पळालाय. मी आत्ता परत ऑफिस मध्ये जाऊन नव्या जोमानं काम करू शकते.

मी म्हणालो चला आता घरी जाऊया. तुझ्या आईचा फोन येईल निघाली नाहीस तर.

क्रमश:

Read Full Post »