Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जानेवारी, 2017


तुला जाऊन आज ५ वर्ष झाली आणि लग्नाला ४५
पण मनात घर करून तूच आहेस
अजूनही …

तू या जगात नाहीयेस असं वाटतच नाही
सदैव माझ्या सोबतच असतेस
अजूनही…

तू बाहेरून आल्यावर पाय धुवायचीस
ते तुझ्या ओल्या पायाचे ठसे बघतो दिसतात का
अजूनही…

तुझी ती आवडती गुलाबी कलकत्ता साडी
धुवून इस्त्री करून कपाटात ठेवतो
अजूनही…

स्वयंपाकघरात काम करताना तुटलेली बांगडी ठेवायचीस खिडकीच्या कट्ट्यावर
लक्ष्य जातच त्या कट्ट्याकडे
अजूनही…

तुला मी दिलेली पहिली भेटवस्तू चांदीचे पैंजण
कपाटात जपून ठेवलेत
अजूनही…

रोज रात्री झोपेत कुशीवरून वळताना
बांगड्या खुळखुळण्याचा आवाज येतो
अजूनही…

जरी नसलीस बरोबर तरी
दिवसभरात घडलेलं सगळं तुला सांगतो
अजूनही…

Read Full Post »


आजुबाजुला बघितल्यावर, कोणाकोणाच्या घरी गेल्यावर, ऑफिसमध्ये लोकांना पाहिल्यावर असं फार वाटायला लागलाय कि प्रत्येकानी कायम प्रेझेंटेबल राहावे. आणि आपल्याला प्रेझेंटेबल पाहून समोरच्याला पण बरे वाटते. स्वतःलाच छान वाटतं, फ्रेश वाटतं ते वेगळं. आता प्रेझेंटेबल म्हणजे सदैव फॅशनेबल कपडे घालून मिरवायला नको. रोजच्याच कपड्यात आपण प्रेझेंटेबल राहू शकतो. हे सगळं सांगायला मी आजिबात फॅशन गुरु वगैरे नाहीये माझ्या कडे पण पाठीवर भोक पडलेला बनियन आहे आणि तो मी (बायकोचं लक्ष्य नसताना) घालतो. पण मी तो असा नाही घालणार कि शर्टातुन ते भोक सहजगत्या दिसेल. गडद शर्टातुन दिसणार नाही असा घालीन.
काही सर्वसाधारण निरीक्षणे नोंदवित आहे. खरेतर या गोष्टी स्वतःलाच समजल्या पाहिजेत किंवा फारतर आई वडिलांनी तरी शिकवल्या पाहिजेत. आता आई वडीलच जर मुलं गाडीवर बरोबर घेऊन सिग्नल मोडणाऱ्या कॅटेगरीमधले असतील तर बोलायलाच नको.
१) ऑफिसला शर्ट पॅन्ट कायम इस्त्री करून वापरावेत. इस्त्री करायला वेळच मिळाला नाही हे धादांत खोटे कारण आहे.
२) केस कायम भांग पाडून व्यवस्थित सेट करावेत. कटिंगचे पैसे वाचवायला दोन कटिंग मधील अंतर वाढवून स्वतःच्या केसांचे भूत करून घेऊ नये. मोठ्या केसांची स्टाइल असेल तर ती नीट मेंटेन करावी.
३) सॉक्स दररोज धुतलेले वापरावेत. एकच सॉक्सचा जोड आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आत करून वापरू नयेत.
४) बुटांना चकचकीत पॉलिश करून वापरावेत. बुटांवरून व्यक्तिमत्व्याची झलक येते. झीजलेल्या सोलचे बूट, बुटांवर चिरापडून फाटलेले बूट बाद करावेत.
५) खिशात कायम रुमाल ठेवावा आणि शिंकताना / खोकताना आवर्जून वापरावा. उगाच सगळीकडे तुषार सिंचन करू नये.
६) नाकातले केस वाढून नाकाच्या बाहेर येऊ देऊ नयेत. त्यांना मिशांमध्ये तर आज्जिबात मिसळून देऊ नका.
७) मिशा असतील तर मिशांची चहा / दूध पिताना काळजी घ्या. कित्ती लोकांना चहा / दूध पिताना त्यात मिशा बुडून त्या पण ते पितात हे कितीवेळ कळतच नाही. समोरच्या माणसाला हे दृश्य दाखवून केविलवाणे करू नये.
८) कानाच्या पाळ्यांवरचे केस वेळोवेळी कापावेत.
९) दाढी सुद्धा सगळीकडून नीट करावी. किती लोकांचे दाढी करूनसुद्धा मानेजवळ दाढीचे शिल्लक राहिलेले खुंट तसेच असतात.
१०) नखे सुद्धा वेळेवर कापावीत. उगाच अंगठ्याची, करंगळीची नखे बोटाच्या उंची इतकी वाढवू नयेत. शक्यतो नेलकटर वापरावे. सर्वांसमोर तोंडात बोटे घालून नखे खाऊन तिथल्या तिथे फुंकर मारून टाकू नयेत.
११) चारचौघात बसून नाकात बोट घालून गिरवू नये. नाकातली घाण टेबलाला, भिंतीला अजिबात पुसू नये. हात स्वच्छ धुवून यावेत.
१२) वरचा मुद्दा डोळ्यातल्या घाणीला पण लागू होतो.
१३) तोंडाला पावडर लावत असलाच तर अगदी चेहऱ्याचा खारादाणा होऊ देऊ नये.
१४) बनियन जर बाहीचा असेल तर शर्टमधून त्याच्या बाह्या बाहेर येऊ देऊ नयेत.
१५) आपल्या अंगाला आजिबात घाण वास येत नाही असा गैरसमज समज समजा नसेल तर छानसा डिओडरंट वापरायला हरकत नाही. ऐपती प्रमाणे डिओडरंट / परफ्युम मध्ये खुप विविधता आहे त्याचा फायदा घ्यावा.
आता या गोष्टी सांगायला मी काही फार ढुडडाचार्य नाहीये. पण या नक्कीच खटकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अवलंबायला सुद्धा सोप्या आणि फारच स्वस्त आहेत. म्हणून जरा स्वतःची पडताळणी करून बघायला काहीच हरकत नाही.या गोष्टी म्हणजे पटल्या तर घ्याव्यात अन्यथा मला लागू होत नाही असे म्हणून सोडून द्याव्यात. माझ्याकडून कोणते निरीक्षण अवधानाने राहून गेले असेल तर नक्की सूचित करावे.

Read Full Post »