तुला जाऊन आज ५ वर्ष झाली आणि लग्नाला ४५
पण मनात घर करून तूच आहेस
अजूनही …
तू या जगात नाहीयेस असं वाटतच नाही
सदैव माझ्या सोबतच असतेस
अजूनही…
तू बाहेरून आल्यावर पाय धुवायचीस
ते तुझ्या ओल्या पायाचे ठसे बघतो दिसतात का
अजूनही…
तुझी ती आवडती गुलाबी कलकत्ता साडी
धुवून इस्त्री करून कपाटात ठेवतो
अजूनही…
स्वयंपाकघरात काम करताना तुटलेली बांगडी ठेवायचीस खिडकीच्या कट्ट्यावर
लक्ष्य जातच त्या कट्ट्याकडे
अजूनही…
तुला मी दिलेली पहिली भेटवस्तू चांदीचे पैंजण
कपाटात जपून ठेवलेत
अजूनही…
रोज रात्री झोपेत कुशीवरून वळताना
बांगड्या खुळखुळण्याचा आवाज येतो
अजूनही…
जरी नसलीस बरोबर तरी
दिवसभरात घडलेलं सगळं तुला सांगतो
अजूनही…
प्रतिक्रिया व्यक्त करा