Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘आठवणी’ Category


तुला जाऊन आज ५ वर्ष झाली आणि लग्नाला ४५
पण मनात घर करून तूच आहेस
अजूनही …

तू या जगात नाहीयेस असं वाटतच नाही
सदैव माझ्या सोबतच असतेस
अजूनही…

तू बाहेरून आल्यावर पाय धुवायचीस
ते तुझ्या ओल्या पायाचे ठसे बघतो दिसतात का
अजूनही…

तुझी ती आवडती गुलाबी कलकत्ता साडी
धुवून इस्त्री करून कपाटात ठेवतो
अजूनही…

स्वयंपाकघरात काम करताना तुटलेली बांगडी ठेवायचीस खिडकीच्या कट्ट्यावर
लक्ष्य जातच त्या कट्ट्याकडे
अजूनही…

तुला मी दिलेली पहिली भेटवस्तू चांदीचे पैंजण
कपाटात जपून ठेवलेत
अजूनही…

रोज रात्री झोपेत कुशीवरून वळताना
बांगड्या खुळखुळण्याचा आवाज येतो
अजूनही…

जरी नसलीस बरोबर तरी
दिवसभरात घडलेलं सगळं तुला सांगतो
अजूनही…

Read Full Post »


सापडली एकदाची माझी बाळबोध कविता, हो ना १२ वर्षांपूर्वी १२ वीचा अभ्यास करता करता लिहिली होती. मी पार विसरून पण गेलो होतो. पण बाबांनी इतक्या वर्षांनी थेट बायकोच्या हातात दिली वाचायला कि हे बघ याचे जुने प्रताप.


मग विचार केला कि कायम संग्रही राहण्यासाठी ब्लॉगवरच टाकावी. एकून २ कविता आहेत पण आत्ता एकच इथे टाकत आहे. मी तरी याला कविता म्हणतो. तुम्ही काही पण म्हणू शकता अगदी पद्य, चारोळी, पाकोळी, मुक्त छंद, अगदी गद्य म्हणलं तरी चालेल.
कॉलेज मध्ये असताना र ला र आणि ट ला ट लावून अनेक गाणी केली होती. काही जुनी विद्यार्थीप्रिय गाणी वाढवली पण होती. जशी A B C D  सातारा त्यातून निघाला म्हातारा, अच्चीत गच्ची गच्चीत टाकी या प्रकारची गाणी आठवून आता हसू येते.
असो या आठवणींमध्ये माझे महाकाव्य प्रकाशित करायचे राहूनच जाईल. तर माझी बाळबोध कविता अशी आहे.

पक्षी उडत होते नभी
मी बसलो होतो घरी
वाटत होते उडावे
पक्ष्यांप्रमाणे…..


वाटत होते स्पर्शावे
निळ्या नभांगणाला
स्वार होऊन ढगावर
जावे दूर देशीला …..


वाटत होते या झाडावरून
त्या झाडावर बसावे
घरटे बांधून दोनाचे
दहा बारा हात करावेत


नुसते वाटून काय होणारे
खरे व्हायला पाहिजे
खरे होण्यासाठी आधी
पक्षी व्हायला पाहिजे


त्यावेळी कवी सदू हे नाव धारण करून कविता केली होती.


आज या कवितेचा प्रकाशन सोहोळा माझ्या एका तमिळ मित्राच्या हस्ते वाचन करून एकूण २ लोकांच्या अथांग जनसमुदायाच्या साक्षीने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. त्या मित्राने नंतर या कवितेचा अर्थ काय असा प्रश्न विचारल्यावर मी त्याला अर्थ सांगितला आणि माझ्या कवितेच्या तमिळ आवृत्तीच्या प्रकाशनाचे सर्व हक्क पण दिले .

Read Full Post »


खरच कितीही थंडी वाजत जरी असली तरी जो पर्यंत सकाळ मध्ये लोक लक्ष्मी रस्त्यावर नेपाळी लोकांकडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत असा फोटो येत नाही तोपर्यंत म्हणावी तशी थंडी पडलेलीच नसते. किंवा पडूच शकत नाही. आता मला काय कोणालाच माहित नसणार की या लोकांना नेपाळी का म्हणतात. कोणीही विचारलेला नसणारे. ते भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधले पण असू शकतात. असो.

ई-सकाळ चा दुवा

ही थंडी मुळात चालू होते तीच सकाळ मुळे. सकाळ मध्ये पहिल्या पानावर १ फोटो येतो. या बातमीचे आणि फोटोचे शीर्षक असते “पुण्यात गुलाबी थंडीचे आगमन” त्या फोटोत १ झाडांमधून जाणारा रस्ता असतो, त्या रस्त्यावरून १ सायकलस्वार चाललेला असतो. त्याच्या शेजारून १ आजोबा स्टाईलची व्यक्ती कानटोपी घालून चाललेली असते. आणि नुकताच सूर्योदय झाला असल्याने या फोटो मध्ये अशी सूर्याची किरणे त्या घनदाट झाडातून रस्त्यावर डोकावत असतात. रस्त्यात थोडेसे धुके पण असते. सो फोटोची एकून रंगसंगती, आणि त्यातली पात्रे योग्य परिणाम साधतात. आणि एकदाची पुणेरी गुलाबी थंडी पडते.

लोक भारानियामातून सुटका म्हणून खुश, लक्ष्मी रस्त्यावरचे विक्रेते त्यांच्या शॉपिंग फेस्टिवलची सुरवात म्हणून खुश. दुकानांमधून गरम कपड्यांचे सेल लागतात. टीव्ही वर च्यवनप्राषच्या जाहिराती येवू लागतात. साठ साल के बुढे या साठ साल के जवान अजून अजून बर्याच.
मागच्या वर्षीचे स्वेटर, काश्मिरी शाली, कानटोप्या, हातमोजे सगळं कपाटांमधून पटापट बाहेर येतात. लोक सकाळी टेकड्यांवर गर्दी करू लागतात. आणि अजून कित्तीतरी.
पुण्यापासून दूर आल्यापासून या सगळ्याच गोष्टींची कमतरता अशी विचार करूनच भरून काढावी लागते.

Read Full Post »


घरापासून दूर दिवाळी साजरी करायची कल्पनाच किती असह्य आहे.घरापासून दूर म्हणजे अगदी एकवेळ आपण भारतात जरी कुठेही असलो तरी दिवाळीची थोडी का होईना मजा आपण लुटू शकतो. कारण थोड्या फार फरकाने सगळीकडे दिवाळी ही साजरी होते. चालीरीतींचा आणि खादाडीचाच काय फरक असेल तो. आपले किती तरी आप्तस्वकीय आपल्यापासून, भारतापासून दूर राहतात ते कशी बरे करत असतील दिवाळी साजरी?
माणसाने कामानिमित्त अगदी चंद्रावर राहावे पण दिवाळीसाठी त्यानी आपल्या घरीच यावे. अशी माझी मनस्तिथी झाली आहे.

दिवाळीसाठी वातावरण निर्मिती:
दिवाळीसाठी वातावरण निर्मिती चालू करण्यात खालील गोष्टींचा समावेश असतो.

  • पिठाच्या गिरण्या चकलीच्या भाजणीच्या, ह. डाळीच्या डब्यांनी गच्च भरून जायला सुरवात होते
  • रस्त्यातून जाताना चकलीच्या खमंग वासाची झुळूक येते
  • बिल्डींग मधून कुठून तरी बेसनाच्या लाडूचा वास हजेरी लावून जातो
  • चकली / शेवेचा सोऱ्या / यंत्र शेअरिंग बेसिस वर फिरू लागते
  • रस्त्यात, दुकानात रंगीबिरंगी आकाशकंदील दिसू लागतात
  • दैनिक सकाळ मध्ये मधूनच फोटो येतो की लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीची लगबग / लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलून गेला वगैरे. या सुमारास चितळे बंधू ग्राहकांसाठी सज्ज अशी पण बातमी एकदा वाचली आहे.

दिवाळी म्हणजे थोडक्यात ती संपताक्षणी परत कधी येणार अशी वाट बघत बसतो तो सण. नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात आले रे आले की पहिल्यांदा काय पाहायचे तर दिवाळी कधी आहे, किती दिवस आहे. ज्या वर्षी अगदी ५ दिवस दिवाळी असेल त्या वर्षी अगदी भारी वाटत की यंदा खूप दिवस अनुभवायला मिळणार दिवाळी. पण एक आहे की दिवाळीचा शेवटच्या दिवसाची संध्याकाळ कधी येउच नये अशी असते. त्या संध्याकाळी फराळाचे रिकामे डबे, संपलेले / फुसके म्हणून उरलेले फटाके, खिडकीतून काढून ठेवलेला आकाशकंदील, शाळा / कॉलेज / ऑफिस चालू व्हायची तारीख असं सगळं नको नको ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागते आणि उद्या पासून तेच रहाट गाडगे पुन्हा चालू अशी भावना मनात येते.

लहानपणची दिवाळी
लहान असताना सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर अगदी टाकणे टाकल्या सारखा लिहिला जायचा. कधी एकदा परीक्षा संपते आणि ती दिवाळीची सुट्टी लागते असं झालेलं असायचं. दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा. लवंगीची माळ सुटी करून वाजवायची. नरकचतुर्दशीला सकाळी पहिला फटका कोण लावतो त्याची स्पर्धा लावायची आणि अजून कित्ती तरी गोष्टी…

दिवाळी म्हणजे कल्ला करायचा. नवे कपडे घ्यायचे , किल्ला करायचा. या किल्ला प्रकारामुळे लहान मुलांच्या क्रीएटीव्हीटीला चालना मिळते. ऑफिशियली चिखलात खेळायला मिळतं ती गोष्ट वेगळी. किल्ला करून झाला की त्यावर अळीव पेरायचे. मग ते उगवले की सगळी चित्र मांडायची. गुहेत वाघ, विहिरीपाशी पाणी भरणारी बाई, मावळे, भाजीवाल्या बायका आणि अति महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराज स्थानापन्न करायचे. एका दिवाळीत तर मी त्या वाघाच्या गुहेत चक्क १ डायनोसोर पहिला होता.

आज त्या सगळ्या साजऱ्या केलेल्या दिवाळ्या डोळ्या समोर येत आहेत. आणि आज असे भारतापासून इतक्या दूर अमेरिकेतल्या एका खेड्यात जिथे मोजून ४ भारतीय टाळकी आहेत अशा वातावरणात दिवाळी सेलीब्रेशन म्हणजे नर्व्हस ब्रेकडाऊन व्हायची वेळ आली होती. पण जशी दिवाळी जाईल असे वाटत होते तशी ती बिलकुल गेली नाही. एक नातेवाईक जवळच राहतात त्यांच्या कडे दिवाळी साठी गेलो होतो. म्हणून दिवाळीची मजा लुटता तरी आली आणि बिन दिवाळीचा जो काही बोजा मनावर होता तो पूर्णपणे निघून गेला.
इतकी वर्षे पुण्यात असताना बरेच भाऊ, मित्र वगैरे असेच शिक्षणासाठी घरापासून दूर गेले होते. तेव्हा वाटायचे की ते लोक त्यांच्या मित्रांसोबत एकत्र जमून वगैरे साजरी करत असतील दिवाळी. त्यामुळे ते लोक दिवाळीला काय करत असतील असा साधा विचार सुध्धा कधी मनात आला नव्हता. आज मला कळले की त्यांनी दिवाळी कशी साजरी केली असेल. कळली म्हणजे कोणाची पाहून कळली नसती स्वतःला अनुभवायला मिळाली म्हणून जाणीव तरी झाली. अन्यथा असे पण काही असते असं कधी कळलेच नसते.
असो जे काही होतं ते चांगल्या साठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. पुढच्या वर्षी ही कसर भरून काढीन.

दीपावलीच्या आणि नूतन सवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

Read Full Post »


सगळ्या शाळांचा पहिला दिवस पार पडला असेल. मला पण माझे शालेय जीवनातील पहिले दिवस आठवले.
मला अगदी नको वाटायचा तो पहिला दिवस. तोच दिवस असं नाही साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळेचे वेध लागायचे. अगदी नको नको व्हायचे.मग भाऊ चिडवायचा “आता शाळा” हे एव्हढं बोलून सुध्धा पोटात धस्स व्हायचे.

का कुणास ठावूक उगाचच भीती वाटायची. कोण असतील नवे शिक्षक? मित्र काय तेच असणार होते ते तरी बरे होते. मग नवीन विषय, नवा अभ्यास असा ब्रह्मराक्षस दिसायचा समोर. मला अभ्यास बिलकुल आवडायचा नाही. मी प्राथमिक शाळेत असताना कोणीतरी सांगितला होतं कि जसा जसा मोठा होशील तसतसा अभ्यास कमी होत जाईल. हे ऐकून मुख्यतः मी शाळेत जायला तयार झालो होतो. पण कसलं काय?

कित्ती वर्ष बाबच पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे.नव्या वहीत कायम उजवीकडच्या पानावर लिहायला आवडायचे. कारण उजवीकडचा पान उलटलं कि त्या डावीकडच्या पानाखाली तो पुठ्ठा येतो ना, मग अक्षर नीट येत नाही. वहीच्या शेवटच्या पानावर कायम अश्या गिरगोट्या मारलेल्या असायचा. मग ते पान भरला कि असा उलटे येत येत ५/६ पाने गिरगोट्याच  असायच्या.
लहान शाळेत रोज १ पेन्सील लागायची. लिहून नाही काही संपायची,तर टोक करून संपायची.कायम टोकदार पेनसिलिनी लिहायचं असायचं ना. काय ओरडायची आई यावरून. नंतर त्या शिसे टाकायच्या पेन्सील बाजारात आल्या होत्या. त्या तर अगणिक  हरवल्या असतील. आमच्या वर्गात १ मुलगा चांगल्या घरातला होतं तरी पेन्सील,कंपास चोरायचा. एकदा त्याला पाळत ठेवून पकडला होतं नि इतका मारलं होतं कि दुसर्या दिवशी आईला शाळेतच बोलावलं होतं. चौथीतल्या मुलां कडून त्यांनी हे अपेक्षित केले नसेल. पण मज्जा आली होती त्याला मारायला. ४/५ मुलं त्याला व्हिलन समजून मारत होतो.
अशा छोट्या आठवणींवर किती तरी लिहिण्यासारखे आहे. बघू परत कधीतरी वाढवीन पोस्ट.

Read Full Post »