Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘कॉलेज’ Category


सापडली एकदाची माझी बाळबोध कविता, हो ना १२ वर्षांपूर्वी १२ वीचा अभ्यास करता करता लिहिली होती. मी पार विसरून पण गेलो होतो. पण बाबांनी इतक्या वर्षांनी थेट बायकोच्या हातात दिली वाचायला कि हे बघ याचे जुने प्रताप.


मग विचार केला कि कायम संग्रही राहण्यासाठी ब्लॉगवरच टाकावी. एकून २ कविता आहेत पण आत्ता एकच इथे टाकत आहे. मी तरी याला कविता म्हणतो. तुम्ही काही पण म्हणू शकता अगदी पद्य, चारोळी, पाकोळी, मुक्त छंद, अगदी गद्य म्हणलं तरी चालेल.
कॉलेज मध्ये असताना र ला र आणि ट ला ट लावून अनेक गाणी केली होती. काही जुनी विद्यार्थीप्रिय गाणी वाढवली पण होती. जशी A B C D  सातारा त्यातून निघाला म्हातारा, अच्चीत गच्ची गच्चीत टाकी या प्रकारची गाणी आठवून आता हसू येते.
असो या आठवणींमध्ये माझे महाकाव्य प्रकाशित करायचे राहूनच जाईल. तर माझी बाळबोध कविता अशी आहे.

पक्षी उडत होते नभी
मी बसलो होतो घरी
वाटत होते उडावे
पक्ष्यांप्रमाणे…..


वाटत होते स्पर्शावे
निळ्या नभांगणाला
स्वार होऊन ढगावर
जावे दूर देशीला …..


वाटत होते या झाडावरून
त्या झाडावर बसावे
घरटे बांधून दोनाचे
दहा बारा हात करावेत


नुसते वाटून काय होणारे
खरे व्हायला पाहिजे
खरे होण्यासाठी आधी
पक्षी व्हायला पाहिजे


त्यावेळी कवी सदू हे नाव धारण करून कविता केली होती.


आज या कवितेचा प्रकाशन सोहोळा माझ्या एका तमिळ मित्राच्या हस्ते वाचन करून एकूण २ लोकांच्या अथांग जनसमुदायाच्या साक्षीने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. त्या मित्राने नंतर या कवितेचा अर्थ काय असा प्रश्न विचारल्यावर मी त्याला अर्थ सांगितला आणि माझ्या कवितेच्या तमिळ आवृत्तीच्या प्रकाशनाचे सर्व हक्क पण दिले .

Read Full Post »


कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत.

१२वी  नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की आता वाटतं की जास्त पैसे असते तरी अशी मजा नसती आली. त्यावेळी मोबाईलचे आजच्या सारखे प्रस्थ नव्हते. हल्ली तर सातवी आठवी पासून पोरं मोबाईल बाळगतात.

घरी खरी कॉलेज ची वेळ माहीत कुठे होती. सकाळी ८ ला कॉलेज भरते  इतकच माहीती. त्यामुळे दिवसभर हुंदडून घरी यायला ४ वाजायचे. आल्यावर अबरचबर करून झाले कि लगेच गणिताच्या क्लासला बाजीराव रोड वर …. प्रा. मनिषा देशपांडे याच्या वर्गात. इथे परत सर्व ग्रुप शेजारी शेजारी म्हणजे धमालच. त्या प्राध्यापिका MD यावानेच ओळखल्या जातात. BCS ला गणितात जो काही पास झालो तो त्यांच्यामुळेच. परत क्लास वरून घरी येईपर्यंत जेवणाची तयारी झालेली असायची. थोडक्यात काय तर घर म्हणजे अक्षरशः लॉजिंग आणि बोर्डिंग झाले होते.

बर आता इतका मोठा ग्रुप म्हणजे छोट्या छोट्या औटींग ट्रिप्स या अनिवार्य असायच्या. त्यात पुण्याला लागुनच अनेक ठिकाणे आहेत. जसे सिंहगड, खडकवासला, पानशेत, मुळशी, भुशी. ही लिस्ट संपणार नाही. या सर्व ठिकाणांना ३ वर्षात मिळून कोटी वेळा तरी गेलो असू. सगळी ठिकाणे साधारण ५० कि.मी च्या अंतरावर असल्याने कॉलेज सुटायच्या वेळी निघून सगळे क्लास च्या आधीपर्यंत सहज घरी पोचायचे. बर इतक्या ट्रिप्स झाल्या तरी कोणाच्याच घरी माहित नाही.कुठे जायचा म्हणाला की सर्व मैत्रिणी एका पायावर तयार. आई बाबा नेहमी सांगायचे की गाडी घेवून दिली आहे ती कॉलेजला जाण्यासाठी. पोरी फिरवायला नाही. जर आम्हाला कधी समजलेना की  पोरी फिरवतो आहेस तर गाडी काढून घेणार. मी पण जोरात हो म्हणायचो.

इतक्या ट्रिप्स केल्या त्यातल्या ९०% ट्रिप्सच्या वेळी माझी गाडी पंक्चर व्हायची. अगदी ठरवून माझीच बर का. दुसऱ्या कोणाचीही कधीही झाली नाही. आधी वाटायचं की माझ्या गाडीमुळे होत असेल. म्हणून चालवायला मी दुसरी गाडी घ्यायचो. तरी नियमात बदल हा नाही. मी जी गाडी चालवीन ती पंक्चर व्हायची ती व्हायचीच. पण यामुळे सगळ्या ट्रिप्स चांगल्याच लक्ष्यात राहिल्या सर्वांच्या.

एकदा नुकताच सिंहगड वारी उरकून आलो होतो. आणि शेजारच्या काकू आईला सांगत होत्या “अहो त्या जोशांचा बंड्या आहे ना तो परवा म्हणे कॉलेजच्या पोरींबरोबर खडकवासल्याला भिजायला म्हणून गेला होता. कशी काय यांच्या घराची लोकं यांना सोडतात देव जाणे.” त्या काकूंना एक मुलगी होती. भोचक भवानी होती एकदम. तिच्या कृपेने त्या कायम अपडेटेड असायच्या.  मी आपलं ते ऐकून तिथून पोबारा केला. म्हणालो जपून राहिलेला बरे.

Read Full Post »