Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘खाणे’ Category


समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे येणारा पचाक पचाक आवाज येत असला तर??

भुर्रूक पचाक पचाक.. ऐकून अंगावर शिसारी आली. म्हणालो नक्की कोणीतरी देसी असणारे. कारण अमेरिकेत हे असलं वर्तन आपण एखाद्या देसीकडूनच अपेक्षित करतो.
उठून उभा राहिलो आणि बघितल तर काय? समोर साक्षात १ देसी संगणाकाकडे बघत तल्लीन होऊन चमचा त्या कपातल्या कॉफीत गरागरा फिरवत होता. नाव गाव समजल्यावर कळले कि तो १ NRI मराठी तमिळ आहे. म्हणाला कालच रुजू झालोय. काल तू सुट्टीवर होतास म्हणून भेट नाही झाली आपली.म्हणाला मी मद्रासी आहे पण जन्मापासून मुंबईकर असल्यामुळे तमिळ कमी आणि मराठी जास्ती येतं मला. मी बरं म्हणालो. मग त्यांनी कोणत्या प्रोजेक्ट साठी आलाय वगैरे सांगितलं.

त्या दिवशी त्याने जेवणाचा डबा आणला नव्हता म्हणून मी वाचलो नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने चळचळत्या लसून फोडणीच्या वासाचे, तर्रीवाले डबे उघडायला सुरवात केली. त्याचं खाऊन झाल्यावर १ तासभर आसमंतात तो वास दरवळत असायचा. मग मी एकदा त्याच्या बॉसला माझ्या क्युबिकल मध्ये कामानिमित्त बोलावले होते. तो आल्या आल्या म्हणाला वास कसला येतोय? मी पलीकडून असं बोट दाखवले. म्हणून त्याने डोकावून पहिले तर त्याला तिथे विश्वरूप दर्शन झाले. माझं न बोलताच काम झाले. मग यथावकाश त्याने त्याला सांगितले आणि ते वासू डबे बंद झाले.

तरीपण भुर्रूक पचाक पचाक चालूच होते. असाच एकदा तो तल्लीन होऊन कडडम कडडम करत असताना मी म्हणालो चमचा पण विरघळेल रे!! हळू ढवळ जरा. मग जरा आवाज कमी झाला.

मी विचार केला कि हा माणूस गेली ४ वर्ष अमेरिकेत असाच वागत आलाय कि काय? अवघड आहे याचे. घरी तू कसा पण का वाग ना. कोण काय म्हणणारे तुला.

मी असे म्हणत नाही कि मी एटिकेट्स चे पुस्तक कोळून प्यायलोय वगैरे पण कमीत कमी बघावे आपण कुठे आहोत, आजूबाजूचे लोक कसे वागत आहेत आणि आपण कसे वागतोय, आपण इथे काय करतोय?

अमेरिकेसाठी निघताना पुण्यात HR नी एक एटिकेट्सचा कोर्स करायला लावला होता. त्यात सगळं शिकवल होतं चारचौघात कसे खायचे, काटा चमच्यानी कसं खायचं, आवाज न करता कसं खायचं ई ई.

मला वाटतंय कि एकतर याने तो कोर्स नक्की बंक केला असणार किंवा त्या शिकवणाऱ्या मास्तरला तरी सगळं विसरायला भाग पाडलं असणार.

Read Full Post »


भेळेच्या धंद्याला तसं म्हणालं तर मरण नाहीच. मंदी असो वा नसो, सिझन कोणताही असो, भेळ हि खावी लागतेच. म्हणजे कोणी खाण्याशिवाय राहूच शकत नाही. एक जमाना असा होता मी आणि मित्र न चुकता सलग २ ते ३ वर्ष रोज भेळ खायचो. अगदी रोज, न चुकता, तरी कंटाळा वगैरे कधीच नाही आला. आणि आता अमेरिकेत आल्यापासून अगदी तरसतोय भेळेसाठी. इतक्या ठिकाणी भेळ खाल्ली तरी गणेश भेळेसारखी सारखी भेळ कधीच आणि कुठेही खाल्ली नाही. बेंगळूरूला असताना भेळ खायची हुक्की आली म्हणून एका ठिकाणी भेळेची ओर्डर दिली आणि मला प्लेट मध्ये जे काही मिळाले त्याला मी काही केल्या भेळ म्हणायला तयार नव्हतो. त्या प्लेट मध्ये असा त्रिकोणी रचलेला भेळेवजा चुरमुर्यांचा लगदा होता. अगदी गचगचीत ओली भेळ. त्याला न चव ना ढव. मी म्हणालो भेळ दिली आहे का कालवलेला दक्षिणात्य भात? तो कानडी मित्र मिटक्या मारत खात होता. मी त्याला म्हणालो एकदा पुण्या मुंबईची भेळ काय असते खाऊन बघ. परत कधीही मी तिथे असे पर्यंत भेळेच्या वाटेला गेलो नाही. भेळेशिवाय अगदी उपासमार चालू होती.

आता पुण्यात भेळ खायची तर कुठे? जसं मिठाई साठी चितळे बंधू तसं भेळेसाठी गणेश भेळेशिवाय दुसरं दुकान / गाडी असूच शकत नाही. त्यांची पहिली गाडी लागायची ती कर्वे रोड वर आत्ताचे Mac’D आहे ना त्या लेन च्या जवळ. मग तिथून ती गाडी कर्नाटक हायस्कूल च्या समोर प्राची / अतिथी हॉटेल पाशी असायची. नंतर त्यांनी भरतकुंज सोसायटी मध्ये १ दुकान थाटले आणि आता या  गणेश भेळेच्या पण पुण्याच्या उपनागत अनेक ब्रान्चेस आहेत.  याशिवाय अजूनही काही प्रसिद्ध भेळवाले आहेत. जसे कॅनॉल वरची भेळ (SNDT कॉलेजच्या कॅनॉल वरून लॉ कॉलेज रस्ता क्रॉस करून तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला हे भेळ मिळते ), पुष्करिणी भेळ (बहुतेक अप्पा बळवंत चौकाच्या जवळ एक शूज चे दुकान आहे त्याच्या जवळ मिळते. दुकानं अवघे काही तासांकरिता उघडते), नवरंग भेळ (फडतरे चौकात शर्मिली दुकानाला लागुनच आहे हे दुकान). कर्वेनगरला ताथवडे उद्यानाजवळ एक भेळेचे दुकान आहे. अगदी गणेश भेळेच्या तोडीची भेळ मिळते इथे. त्याचा नाव विसरलो मी. बहुतेक विशाल भेळ असावे…. याशिवायही भेळेचे चोचले पुरविण्यासाठी सर्व बाग / उद्यानांबाहेर अनेक भेळ वाले आहेत, ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

आता भेळ खायला गेल्यावर नुसताच खेळ खाऊन घरी असं सहसा होत नाही. मग आलोच आहे तर पाणी पुरी , SPDP, रगडा पुरी पण होऊन जाऊदे असं होते. घरी कितीही म्हणालं की भेळ करू तरी त्या घराच्या भेळेला “त्या” भेळेची सर कधीच येत नाही.

भेळ खाताना जीभ झोंबून डोळ्यातून पाणी आलं की जे वाटतं ना की हाह आता बरे वाटले त्याला म्हणतात चटपटीत खाल्ल्याचे समाधान. आत्मा तृप्त होणे, ब्रह्मानंदी टाळी वाजते म्हणजे काय ते हेच असावे.

Read Full Post »


उकडीच्या मोदकांचा घाट

काही दिवसांपूर्वी अंगारकी चतुर्थीला मित्रासोबत बोलत असताना मला तो चिडवत होता की तो उकडीचे मोदक खात आहे,मस्त झाले आहेत आणि काय काय…. मी म्हणालो मी पण करून खाईन मोदक त्यात काय आलं मोठंसं? असं म्हणता म्हणता मी मोदक करून दाखवायचं challenge घेतलं.

ukadiche modak

ukadiche modak

आता प्रश्न होता तांदुळाची पिठी, खवलेला नारळ अमेरिकेत कुठून मिळणार? मला जवळचं भारतीय  सामानाचं दुकान तब्बल ९० मैलावर आहे. एका मित्राला सांगितल्या या गोष्टी आणायला. न विसरता तो पिठी घेवून आला पण खवलेला नारळ विसरला. मग काय? walmart मधून नारळ आणला. आता पुढचा प्रश्न होता तो फोडणार कसा? कोयता नाही, खाली कुठे दगड पण मिळेना. म्हणून शेवटी चक्क टेबल स्पून नि हाणून हाणून फोडला तो नारळ.

तो चमचा जरा भक्कम होता नाहीतर तोच फुटला असता. एक वेळ अशी आली होती कि नारळ फुटायचं नावच घेईना. तरी न कंटाळता चमच्याचे घणाघाती वार करत होतो नारळावर. खूप वेळानी नारळालाच कंटाळा आला आणि तो एकदाचा फुटला. मग त्या नारळाची करवंटी कम कवटी कशी वेगळी केली माझं मलाच ठाऊक. अजूनही मोदक करायचा बेत पक्का होता माझा.
मग चीजच्या किसणीवर नारळ किसला. झाला नारळ तर तयार झाला. मग १ फटक्यात पुरण तयार केला. गूळ, बदाम,पिस्ते,वेलची,केशर घालून सारण पूर्ण केलं. असं मस्त सुगंध दरवळत होता म्हणून सांगू. मग यथावकाश शिजवलेल्या तांदुळाच्या पिठीच्या पाऱ्या करून त्यात ते सारण भरून अशा मस्त कळ्या पाडल्या मोदकाला आणि मोदक तयार…. अक्षरशः २ तासात केले मोदक. खूपच सही वाटला कामगिरीवर…

Read Full Post »