Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑगस्ट, 2009


काल असे भयानक स्वप्न पडले की सकाळी उठल्यावर किती वेळ मी त्याच अवस्थे मध्ये होतो. जणू काही रात्री झोपायच्या आधी सगळं तसं घडले होते. बापरे बाप …..

तर एकूण झाले असे होते. माझी कोणती तरी अति महत्वाची परीक्षा होती सी. ए.होती का तत्सम एखादी. इतकी महत्वाची की या जगात त्यापेक्षा दुसरं महत्वाच काहीच नाही. आणि बहुदा त्या परीक्षेचा एकच अटेम्प्ट होता म्हणजे एकदा त्यात नापास झालो की आयुष्यातून उठणार.
मुळात मी शास्त्र शाखेचा विद्यार्थी. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षेला मी १ महिना आधी जागा झाल्यावर माझ्या टरकलेपणाची जाणीव येवू शकेल.
बर ती परीक्षा होती मे महिन्यात. आणि मला अभ्यासाची जागच मुळी आली होती एप्रिल महिन्यात. म्हणजे लिटरली परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यावर मी अभ्यासासाठी जागा झालो होतो. आणि विषय सुध्धा कधीही न ऐकलेले. च्यायला त्याच वेळी मला झोपेतून खडबडून जाग आली. विचार केला काय चाललाय? कसली परीक्षा आहे माझी? काहीच सुचेना म्हणून परत झोपलो. तर हेच परीक्षेचं स्वप्न परत चालू झाले. मी मित्रांकडे चौकशी करत होतो की किती अवघड आहे परीक्षा आणि काय काय…. चांगली अकौंटसची  जाडजुड पुस्तक घेवून फिरत होतो कोणत्या तरी कॉलेज मध्ये.
याच सुमारास मला झोपेतून परत जाग आली. वेळ बघितली तर पहाटेचे साडे तीन वाजले होते. जाम फाटली होती माझी.  घाम फुटला होता. मी पाणी प्यायलो आणि एकीकडे विचार करत होतो कसा होणार माझं या परीक्षेत? नापास झालो तर आई बाबा काय म्हणतील?…. म्हणजे स्वप्नात जे चाललाय ते खरं आहे हे  मी समजून चुकलो होतो. परत झोपल्यावर स्वप्न तिथून परत चालू झालं होतं.

सकाळी घड्याळाचा गजर होऊन उठलो तोच मुळी प्रचंड टेनशन  मध्ये. उठल्यावर सुध्धा पुढची ५ ते १० मिनिटे मी त्या परीक्षेच्या दडपण खालीच होतो. आत्ता सुध्धा मला त्या स्वप्नातल्या घटना आणि त्यासाठी मोजलेल्या घटका आठवल्या तरी अंगावर काटा येतो. नको रे बाबा असलं स्वप्नं परत कधी. लोकांच्या स्वप्नात सुंदर तरुणी आणि निसर्गरम्य ठिकाणे येतात आणि मला काळात नाही कसली ही अघोरी स्वप्नं पडतात. पूर्वी सुध्धा अशी अंगावर काटा आणणारी स्वप्न मला पडली आहेत.
जब वी मेट मध्ये त्या करीना कपूर ला गाडी चुकल्याची स्वप्न पडायची. ती तरी बरी म्हणायची. ही गाडी चुकली तर पुढची गाडी मिळेल. ठीके गाडी नाही मिळाली तर विमानांनी जाल. तेही नसेल तर खाजगी गाडी करून जाल पण जाल तरी…
सकाळी जेव्हा भानावर आलो तेव्हा जो सुटकेचा निश्वास टाकलाय म्हणून सांगू की बस. हुह ह ह!!!!!!!!!!!!!!!

Read Full Post »


चला चला तयारीला लागा. १५ ऑगस्ट अवघ्या २ आठवड्यावर आला आहे. राष्ट्रभक्तीचा फिवर हळू हळू चढू लागला असेल. ओडीओ केसेट आणि सीडीच्या बाजारपेठ राष्ट्रभक्तीपर गाण्यांनी दुमदुमून गेल्या असतील. लहान मोठे, गोड भसाडे असे सर्व प्रकारचे आवाज आधीच सज्ज होऊन गाणी रेकॉर्ड करून पार असतील. स्पीकर भाड्यानी देणारी दुकाने भाव लावत असतील. आता १५ ऑगस्ट म्हणजे सगळी गणेश मंडळे ते स्पीकर भाड्यानी घेवून ती गाणी नाही का लावणार? त्या स्पीकरच्या ज्या भिंती लावतात ना त्याला काय म्हणतात माहित आहे का? त्याला थप्पी म्हणतात. जितके स्पीकर जास्त तितका ते गणेश मंडळ भारी असा दावा त्या मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते करत असतात. मग लयी भारी बनायला ती चढाओढ ती स्पर्धा सगळं सगळं आलं.
१५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर गरजू मुलांना वही वाटप, रक्तदान शिबिरे यासारखे कार्यक्रमांचे आराखडे बांधले जात असतील.
कारण तसेही त्यापुढच्या आठवड्यात गणपती बसत आहेत म्हणजे काय कामाला उधाणच येणार. गणेशोत्सवावर नंतर लिहीन कधीतरी.
झेंडा आणि भिरभिरे कारागीर वेताच्या छडीवर ती भिरभिरे लावत असतील. भिरभिरं लावून झाला कि मग ते गरागरा फिरलं पाहिजे तर ते खरं.

नेते मंडळींनी पांढरे शुभ पोशाख कपाटातून काढून ट्राय केले असतील. कारण २६ जानेवारी नंतर आजच तो पांढरा ड्रेस हे जग पहात असेल आणि या ६ / ७ महिन्याच्या कालावधीत त्या महाशयांचे माप त्या ड्रेस मध्ये झाकलं गेलं पाहिजे ना…..
त्या नेते मंडळींचे PA कुठून कुठून नवनवी भाषणे लिहून आणायच्या गडबडीत असतील. राजकीय पार्टीचा प्रचार आणि १५ ऑगस्ट असे २ पक्षी त्या भाषणांनी मारायचे असतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपला तिरंगा…… तिरंगा फडकवायचा म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारची घडी घातली पाहिजे. वर्षभर निट पावित्र्य पूर्वक ठेवला पाहिजे. बुधवार पेठेत लहान मोठ्या आकाराचे झेंडे विक्री साठी उपलब्ध असतील.

सर्व शाळांची NCC आणि Scout ची मंडळी त्यांच्या तयारीत असतील.
हे सर्व चालू असताना नोकरदार मंडळीची वेगळीच तयारी चालू असेल. ट्रीप ला जायची. कारण १५ ऑगस्ट म्हणजे हक्काची सुट्टी. आणि शनिवार रविवार ला जोडून आलेला १५ ऑगस्ट म्हणजे काय सांगू? या वर्षी नेमकी हक्काची १ दिवस सुट्टी गेली असा सार्वत्रिक सूर असणार.
तरी जाणारे शुक्रवारची सुट्टी टाकून जायचा प्लान करत असणार…. आणि जे कौटुंबिक लोक कुठे जाणार नाहीत ते १५ ऑगस्टला सकाळी कुठल्याश्या बेकरीबाहेर पेटिस किव्वा इडली चटणी साठी रांगेत उभे असतात.

अरे पण काहीतरी कमी आहे. हे सगळं करत असताना देशभक्ती कुठे आलीच नाही. हे सगळं केलं की आपण देशभक्त होतो का? काय केलं की माझी देशभक्ती दिसेल?
ज्याचं देशावर खरं प्रेम आहे त्याला त्याची देशभक्ती दाखवायची गरज नसते. त्याची प्रत्येक कृती हि राष्ट्रासाठी असते. आपण आपलं जे काही काम असो, मग ते कोणतेही असो ते जर आपल्या दृष्टीने ११०% देवून केले तर एका अर्थानी आपण राष्ट्राच्या उन्नतीला हातभारच लावू.

ए मेरे वतन के लोगो
जरा आंख मे भरलो पाणी
जो शहीद हुवे हीन उनकी
जरा याद करो कुर्बानी

जय हिंद
वंदे मातरम्!

Read Full Post »