Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for सप्टेंबर, 2011


मी जगात सर्वात कोणाला घाबरत असेन तर डेंटीस्टला. देवानी यांना जन्मालाच का घातले इथपासून प्रश्न पडायला सुरवात होते आणि लगेच मनात पण येते कि देवाने जन्माला घातले आहे म्हणून आपल्या तोंडात दात शाबूत तरी आहेत. तरी तमाम डेंटीस्टना अजून १०० वर्षे आयुष्य लाभू दे. कोणतीही टूथ पेस्ट वापरा, दात कितीही घासा, फ्लॉस करा तरी दातांचे व्हायचे तेच होणार असते. हेरीडिटीमुळे सर्व काही व्हायचे ते होत असते.

डेंटीस्ट म्हणालं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टरांच्या हातातले सुईSSS करणारे दात कोरणारे यंत्र. या यंत्राची एक वेगळी दहशत माझ्या मनात बसली आहे.

डॉक्टर या मशीनला वेगवेगळ्या सुया लावायला लागले कि वाटते हे मला एकदाचे मारूनच का टाकत नाहीत. सगळेच प्रश्न सुटतील.
नंतर आठवते ते म्हणजे पाण्याची नळी ज्यातून ते गरम / गार पाण्याची पिचकारी दातावर मारतात. आणि या पाण्याचा स्पर्श त्यावेळी डोक्यात ज्या कळा मारून जातं ना ते भोगणाराच समजू शकेल.
नंतर नंबर लागतो तो त्या सक्शन नळीचा. ती आपले काम इमाने इतबारे करते.
नंतर ती वर खाली होणारी, रुग्णाला आरामदायी दिसणारी मऊ मऊ खुर्ची. बटण दाबले की रुग्ण आणि जीव दोन्ही वर खाली….
डॉक्टरांचे २ हात, त्यांच्या मदतनिसाचे २ असे चतुर्भुज हस्तानी आ वासलेल्या व्यक्तीच्या तोंडात ते युद्ध चालू असते. कितीही लक्ष्य द्यायचे ठरवले तरी त्या मागे चालू असलेल्या मंद मंद इनस्टुमेंटल गाण्यांकडे लक्ष्य लागत नाही. आणि डॉक्टर आपले ते गाणे गुणगुणत काम करत असतात.

असो तर ज्यांना हे माहित नाही त्यांच्या साठी ही इतकी तोंड ओळख आणि ज्यांना माहित आहे त्यांना उजळणी पुरेशी आहे.
तर आपल्या दातांची जास्तीतजास्त काळजी घेणे आणि डेंटीस्टला कमीत कमी भेट देणे यासाठी खालील काळजी घेता येते.

१) प्रत्येक जेवणानंतर दात कानाकोपऱ्यातून, व्यवस्थित घासावेत. ऑफिसमध्ये पण जेवणानंतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता दात घासावेत. दात आपले आहेत. मग कोण काय म्हणाले तर त्यांचे दात घशात घालायला हरकत नाही.

२) कोक, पेप्सी सारखी घातक पेय जी दातांचे आयुष्य कमी करतात त्यांच्या पासून दूर राहिलेले बरे. आता दूर म्हणजे हद्दपार करणे असे नाही.
३) आबर-चबर खाऊन झाल्यावर खळखळून चुळा भरणे.
४) जराशी जरी दाताला कीड लागल्याची जाणीव झाली तर बिलकुल दुर्लक्ष्य करता कामा नये. Stitch in time, saves nine…..
ताबडतोप डेंटीस्टची भेट घेवून सोक्ष मोक्ष लावावा. हातची वेळ घालवली तर दात गमावण्याची वेळ येवू शकते. चांदी, सिमेंट, crown करून दात वाचवता येवू शकतो.
५) ते डॉक्टर / ते हॉस्पिटल अतिशय स्वस्तात दाताची कामे करून देतात. देत असतील स्वस्तात पण सर्वोत्तम करत असतील याची खात्री नाही. म्हणून माहितीतले चांगले काम करणारे, पैसे न काढणारे आणि तरी पण स्वस्तातले डॉक्टर मिळू शकतात.
६) उगाचच पिनेनी, टूथपिकने दात कोरत बसू नये.
७) जर आपल्या घरात खराब दातांची प्रथा असेल तर लहानपणापासूनच दातांची काटेकोर काळजी घ्यावी.

आपले दात हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा भाग आहेत. पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात कोणाला आवडणार नाहीत. म्हणून त्यांची योग्य काळजी पण आपल्याच हाती आहे.

Read Full Post »