Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for डिसेंबर, 2010


सापडली एकदाची माझी बाळबोध कविता, हो ना १२ वर्षांपूर्वी १२ वीचा अभ्यास करता करता लिहिली होती. मी पार विसरून पण गेलो होतो. पण बाबांनी इतक्या वर्षांनी थेट बायकोच्या हातात दिली वाचायला कि हे बघ याचे जुने प्रताप.


मग विचार केला कि कायम संग्रही राहण्यासाठी ब्लॉगवरच टाकावी. एकून २ कविता आहेत पण आत्ता एकच इथे टाकत आहे. मी तरी याला कविता म्हणतो. तुम्ही काही पण म्हणू शकता अगदी पद्य, चारोळी, पाकोळी, मुक्त छंद, अगदी गद्य म्हणलं तरी चालेल.
कॉलेज मध्ये असताना र ला र आणि ट ला ट लावून अनेक गाणी केली होती. काही जुनी विद्यार्थीप्रिय गाणी वाढवली पण होती. जशी A B C D  सातारा त्यातून निघाला म्हातारा, अच्चीत गच्ची गच्चीत टाकी या प्रकारची गाणी आठवून आता हसू येते.
असो या आठवणींमध्ये माझे महाकाव्य प्रकाशित करायचे राहूनच जाईल. तर माझी बाळबोध कविता अशी आहे.

पक्षी उडत होते नभी
मी बसलो होतो घरी
वाटत होते उडावे
पक्ष्यांप्रमाणे…..


वाटत होते स्पर्शावे
निळ्या नभांगणाला
स्वार होऊन ढगावर
जावे दूर देशीला …..


वाटत होते या झाडावरून
त्या झाडावर बसावे
घरटे बांधून दोनाचे
दहा बारा हात करावेत


नुसते वाटून काय होणारे
खरे व्हायला पाहिजे
खरे होण्यासाठी आधी
पक्षी व्हायला पाहिजे


त्यावेळी कवी सदू हे नाव धारण करून कविता केली होती.


आज या कवितेचा प्रकाशन सोहोळा माझ्या एका तमिळ मित्राच्या हस्ते वाचन करून एकूण २ लोकांच्या अथांग जनसमुदायाच्या साक्षीने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. त्या मित्राने नंतर या कवितेचा अर्थ काय असा प्रश्न विचारल्यावर मी त्याला अर्थ सांगितला आणि माझ्या कवितेच्या तमिळ आवृत्तीच्या प्रकाशनाचे सर्व हक्क पण दिले .

Read Full Post »


समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे येणारा पचाक पचाक आवाज येत असला तर??

भुर्रूक पचाक पचाक.. ऐकून अंगावर शिसारी आली. म्हणालो नक्की कोणीतरी देसी असणारे. कारण अमेरिकेत हे असलं वर्तन आपण एखाद्या देसीकडूनच अपेक्षित करतो.
उठून उभा राहिलो आणि बघितल तर काय? समोर साक्षात १ देसी संगणाकाकडे बघत तल्लीन होऊन चमचा त्या कपातल्या कॉफीत गरागरा फिरवत होता. नाव गाव समजल्यावर कळले कि तो १ NRI मराठी तमिळ आहे. म्हणाला कालच रुजू झालोय. काल तू सुट्टीवर होतास म्हणून भेट नाही झाली आपली.म्हणाला मी मद्रासी आहे पण जन्मापासून मुंबईकर असल्यामुळे तमिळ कमी आणि मराठी जास्ती येतं मला. मी बरं म्हणालो. मग त्यांनी कोणत्या प्रोजेक्ट साठी आलाय वगैरे सांगितलं.

त्या दिवशी त्याने जेवणाचा डबा आणला नव्हता म्हणून मी वाचलो नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने चळचळत्या लसून फोडणीच्या वासाचे, तर्रीवाले डबे उघडायला सुरवात केली. त्याचं खाऊन झाल्यावर १ तासभर आसमंतात तो वास दरवळत असायचा. मग मी एकदा त्याच्या बॉसला माझ्या क्युबिकल मध्ये कामानिमित्त बोलावले होते. तो आल्या आल्या म्हणाला वास कसला येतोय? मी पलीकडून असं बोट दाखवले. म्हणून त्याने डोकावून पहिले तर त्याला तिथे विश्वरूप दर्शन झाले. माझं न बोलताच काम झाले. मग यथावकाश त्याने त्याला सांगितले आणि ते वासू डबे बंद झाले.

तरीपण भुर्रूक पचाक पचाक चालूच होते. असाच एकदा तो तल्लीन होऊन कडडम कडडम करत असताना मी म्हणालो चमचा पण विरघळेल रे!! हळू ढवळ जरा. मग जरा आवाज कमी झाला.

मी विचार केला कि हा माणूस गेली ४ वर्ष अमेरिकेत असाच वागत आलाय कि काय? अवघड आहे याचे. घरी तू कसा पण का वाग ना. कोण काय म्हणणारे तुला.

मी असे म्हणत नाही कि मी एटिकेट्स चे पुस्तक कोळून प्यायलोय वगैरे पण कमीत कमी बघावे आपण कुठे आहोत, आजूबाजूचे लोक कसे वागत आहेत आणि आपण कसे वागतोय, आपण इथे काय करतोय?

अमेरिकेसाठी निघताना पुण्यात HR नी एक एटिकेट्सचा कोर्स करायला लावला होता. त्यात सगळं शिकवल होतं चारचौघात कसे खायचे, काटा चमच्यानी कसं खायचं, आवाज न करता कसं खायचं ई ई.

मला वाटतंय कि एकतर याने तो कोर्स नक्की बंक केला असणार किंवा त्या शिकवणाऱ्या मास्तरला तरी सगळं विसरायला भाग पाडलं असणार.

Read Full Post »


खरच कितीही थंडी वाजत जरी असली तरी जो पर्यंत सकाळ मध्ये लोक लक्ष्मी रस्त्यावर नेपाळी लोकांकडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत असा फोटो येत नाही तोपर्यंत म्हणावी तशी थंडी पडलेलीच नसते. किंवा पडूच शकत नाही. आता मला काय कोणालाच माहित नसणार की या लोकांना नेपाळी का म्हणतात. कोणीही विचारलेला नसणारे. ते भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधले पण असू शकतात. असो.

ई-सकाळ चा दुवा

ही थंडी मुळात चालू होते तीच सकाळ मुळे. सकाळ मध्ये पहिल्या पानावर १ फोटो येतो. या बातमीचे आणि फोटोचे शीर्षक असते “पुण्यात गुलाबी थंडीचे आगमन” त्या फोटोत १ झाडांमधून जाणारा रस्ता असतो, त्या रस्त्यावरून १ सायकलस्वार चाललेला असतो. त्याच्या शेजारून १ आजोबा स्टाईलची व्यक्ती कानटोपी घालून चाललेली असते. आणि नुकताच सूर्योदय झाला असल्याने या फोटो मध्ये अशी सूर्याची किरणे त्या घनदाट झाडातून रस्त्यावर डोकावत असतात. रस्त्यात थोडेसे धुके पण असते. सो फोटोची एकून रंगसंगती, आणि त्यातली पात्रे योग्य परिणाम साधतात. आणि एकदाची पुणेरी गुलाबी थंडी पडते.

लोक भारानियामातून सुटका म्हणून खुश, लक्ष्मी रस्त्यावरचे विक्रेते त्यांच्या शॉपिंग फेस्टिवलची सुरवात म्हणून खुश. दुकानांमधून गरम कपड्यांचे सेल लागतात. टीव्ही वर च्यवनप्राषच्या जाहिराती येवू लागतात. साठ साल के बुढे या साठ साल के जवान अजून अजून बर्याच.
मागच्या वर्षीचे स्वेटर, काश्मिरी शाली, कानटोप्या, हातमोजे सगळं कपाटांमधून पटापट बाहेर येतात. लोक सकाळी टेकड्यांवर गर्दी करू लागतात. आणि अजून कित्तीतरी.
पुण्यापासून दूर आल्यापासून या सगळ्याच गोष्टींची कमतरता अशी विचार करूनच भरून काढावी लागते.

Read Full Post »